औरंगाबाद : औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रावर अजून तरी ’कोरोना परिणाम’ थेट असा जाणवत नाही. मात्र येत्या दोन-तीन महिन्यात कोरोनाचा कहर कमी झाला नाही तर औद्योगिक क्षेत्र प्रचंड संकटात येईल आणि त्याचा परिणाम बेकारी वाढण्यातही होऊ शकतो. अशी चिंता उद्योगक्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
’सांजवार्ता’ ने ज्येष्ठ उद्योजक आणि राजकीय- सामाजिक क्षेत्रात तेवढ्याच अधिकाराने वावरणार्या राम भोगले यांना ’ कोरोना आणि औद्योगिक क्षेत्र’ या विषयावर छेडले असता ते म्हणाले की, सर्वत्र कोरोना ची दहशत असल्याने काही क्षेत्र बंद करण्यात आले आहे. उद्योग क्षेत्रावर सध्या थेट परिणाम नाही. उद्योगक्षेत्रात हळू-हळू परिणाम जाणवायला लागतील. सध्या प्रोडक्शन व्यवस्थित आहे. मार्केटमध्ये मागणी जशी कमी होईल तसा परिणाम उद्योगक्षेत्रावर होईल. आम्ही कंपन्यांमधून माल पाठविला तर तिकडे देशात त्यांनी उतरविलाच नाही आणि कोरोना मुळे तिकडे प्रवेशच दिला नाही तर आमचे नुकसान होऊ शकते. मार्च अखेर, एप्रिल महिन्यात उद्योगक्षेत्रावर परिणाम जाणवेल. मराठवाड्यातुन तब्बल 70 देशांना वेगवेगळ्या गोष्टी एक्स्पोर्ट होतात. त्यात चायना ला फारसा एक्सपोर्ट होत नाही. आणि तिथेही काही कंपन्या सुरू आहेत. त्यामुळे एवढा फारसा परिणाम नाही. आपल्या इथून दुबई, सौदीअरेबिया अमेरिका, युरोप, ब्रिटन, जर्मनी या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी एक्सपोर्ट होतात. 20 दिवस जर लोक मार्केटमध्ये गेलेच नाही तर मार्च अखेर आणि एप्रिल महिन्यात 50 टक्के परिणाम होऊ शकतो. अशी चिंता राम भोगले यांनी व्यक्त केली. पुढे ते असेही म्हणाले की, उद्योजकांच्या हातात काहीच नाही. आम्ही तरी लोकांना असे सांगू शकत नाही की मार्केटमध्ये जाऊन माल घ्या म्हणून. सरकारने बंदी केल्याने आम्ही तिकडे जाऊही शकत नाही आणि तिकडे जाऊन विक्रीही करू शकत नाही. त्यामुळे परिमाण होऊ शकतो अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
टार्गेटला फटका बसणार: मनिष अग्रवाल
सध्या मार्च अखेरचे टार्गेट पूर्ण करण्याची चिंता असल्याचे मसीआ चे सचिव मनिष अग्रवाल यांनी सांगितले. औरंगाबाद शहरातून युरोप, चीन, जर्मनी, स्वीडन येथे वाहनाचे सुट्टे भाग एक्सपोर्ट होतात. ते सध्या थांबविले आहे. त्यामुळे मार्च अखेर परिणाम जाणवतील. परंतु आरोग्यासाठी हे होणे गरजेचे आहे. आम्ही विशेष काळजी घेत आहे. कर्मचार्यांना मास्क, सॅनेटाईझर करण्यासाठी सांगितले जात आहे. आम्ही विशेष काळजी घेऊन काम करत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.